पोहरा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ९५७ कोटींचा प्रकल्प
: दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात सुमारे १ हजार ३०० कोटींच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. दक्षिण सिवरेज झोनमधून वाहत असलेल्या सांडपाण्यामुळे पोहरा नदी अत्यंत प्रदूषित झाली आहे. या नदी मध्ये होणारे प्रदूषण कायम स्वरूपी बंद करण्यासाठी तसेच नैसर्गिक जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता ९५७ कोटी रूपयांचा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण सिवरेज झोनमधील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. यावेळी केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सर्वश्री प्रविण दटके, डॉ.परिणय फुके, आशिष जसस्वाल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे, मनपाच्या अतिरीक्त आयुक्त आंचल गोयल, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पामुळे दक्षिण सिवरेज झोनमध्ये वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यामुळे नागनदीप्रमाणेच पोहरा नदी सुध्दा प्रदूषणमुक्त होईल. येथील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर निघणाऱ्या पाण्याचा इतर प्रयोजनासाठी पुर्नवापर करणे शक्य होणार आहे. सिवरेज लाईनचा प्रश्न पूर्णपणे सुटणार असल्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे. शहरातील विविध विकास कामांमध्ये नवीन टाऊन हॉल इमारतीचे बांधकाम, बाळासाहेब ठाकरे प्राथमिक शिक्षण, कला व सांस्कृतिक केंद्राचे बांधकाम, कृत्रिम विसर्जन कुंड्याचे बांधकाम, शहरातील सौंदयीकरण, दक्षिण -पश्चिम क्षेत्रातील जयताळा व गायत्रिनगर जलकुंभाचे लोकार्पण तसेच चंद्रनगर, सर्वत्रनगर, वैभवनगर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
नागपूर शहरातील नागरिकांना काही भागात चोवीस बाय सात पाणी पुरवठा करण्यात येत असून शहरातील अपुर्ण जलकुंभाचे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या चार महिन्यात सर्व शहराला चोवीस बाय सात पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल. अशी माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपूर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे तसेच जल, वायू व ध्वनी प्रदर्शनापासून मुक्त करण्यासाठी सुमारे पाच हजार कोटींची कामे सुरु करण्यात येत आहेत. या कामांमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा निर्माण होतील. शहरात लहान ड्रेनेज लाईन असल्यामुळे या व्यवस्थेत बदल करुन ही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठीचे कामे उच्च दर्जाची व्हावी तसेच नागनदी प्रदूषणमुक्त करण्यासोबत शहरातील नागरिकांनी सीएनजी व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.